Pune News : ‘सध्या तरी पुणे शहरात Lockdown चा विचार नाही, पण….’ – मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुणे पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरू नये यासाठी आता महापालिका व जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र याचवेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सध्या तरी लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही पण पुणेकरांनी कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. आगामी काळात आपल्याला लॉकडाऊन, मायक्रो कंटेन्मेंट झोन यांसारख्या गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. चिंता करण्याचे कारण नाही मात्र पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील यावेळी महापौर मोहोळ यांनी केले आहे.

महापौर मोहोळ म्हणाले की, पुणे शहरातील वारजे, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, नगररस्ता या चार भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण शहरातील महापालिकेची कोरोना हॉस्पिटल व आरोग्य यंत्रणा देखील सक्षमपणे कार्यान्वित आहे. मात्र प्रमुख हॉस्पिटल असलेल्या जहांगीर, दीनानाथ मंगेशकर,रुबी हॉल आदी रुग्णालयात बेड्सची कमतरता आहे. पण कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाला आदेश दिले आहेत. रुग्णसंख्या वाढलेल्या भागात टेस्टिंग वाढवण्यावर भर येणार आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आजमितीला 1300 वरुन 1700 वर पोहचली आहे. शहरात आजमितीला पॉझिटिव्ह रेट 4.6 वरुन 12 वर झाला आहे.तसेच विविध ठिकाणी 17 स्वाब सेंटर देखील सुरू आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्याठिकाणी स्वाब सेंटर वाढवणार आहे. सरकारी यंत्रणातील नायडू, बाणेर, ससून रुग्णालयात 1163 बेड उपलब्ध असून खासगी रुग्णालयात 3 हजार बेडस उपलब्ध आहेत. मास्क संदर्भात कारवाई कडक करण्याच्या सूचना पोलीस विभागाला करणार असल्याचे महापौर मोहोळ म्हणाले.