सध्याची परिस्थिती पाहता ‘लॉकडाऊन’ वाढणार ? PM मोदींनी बोलावली 27 एप्रिलला बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. 14 एप्रिलला पहिला लॉकडाऊन संपणार होता, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची विनंती पंतप्रधान मोदीं यांना केली. त्यानंतर पंतप्रधानांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. सध्या देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 एप्रिलला देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे दररोज बदलत आहेत. देशात महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. यापूर्वी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करताना काही ठिकाणी अटी शिथिल केल्या होत्या. 20 एप्रिलनंतर निर्बंध थोडेफार शिथिल केले गेले. ज्या परिसरात जास्त कोरोनाचे रुग्ण नाही, त्या भागाचे झोन तयार करून उद्योगांना अटीशर्थींवर सुरुवात करण्याची मुभा देण्यात आली. राज्य सरकारने रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन अशी विभागणी करुन राज्यात व्यवहार सुरु केले आहेत. यात रेड झोनमधील जिल्ह्यात बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

या सगळ्याचा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर लॉकडाऊनबाबत आणि कोरोना लढ्याबाबत पुढील भूमिका ठरवली जाणार असल्याची शक्यता आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत पत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार पंतप्रधान मोदींसोबतच्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव, आरोग्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनी हजर राहायचे आहे.