सिंंधुदुर्ग जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 7 दिवसांचा कडक  Lockdown जाहीर

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्गत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रविवारी (दि.9)  रात्री 12 वाजल्यापासून ते 15 मे पर्यंत हा कडक लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती  सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि  राज्याचे  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना आधी स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे. पर्यटकांसाठी जिल्हाबंदी असल्याचेही सामंत म्हणाले.

पालकमंत्री  सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 2 लाख नागरिक बाहेरून आले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 50 ते 60 नागरिकांना सामुदायिक संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून 15 मे 2021 पर्यंत हा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. यात सकाळी 7 ते 11 पर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. मात्र ग्राहक दुकानात येणार नाहीत तर विक्रेता ग्राहकांना घरपोच सेवा देईल. तसेच शेती कामांना परवानगी राहील. रेशन दुकानांना सकाळी 7 ते 11 पर्यंत शिधापाटप करण्यास परवानगी दिली आहे.  निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही सामंत यांनी म्हटले आहे.