प्रकाश राज म्हणतात, “माझ्या गालावर ही सणसणीत चपराक आहे”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीतील कल समोर येत आहेत. अनेक नेते आघाडी घेताना दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत सिनेसृष्टीतील काही कलाकारांना उमेदवारी मिळाली होती. प्रकाश राज हे त्यापैकी एक आहे. सरकारवर खुलेपणाने टीका करणारे आणि समाजातील गंभीर प्रश्नांवर बेधडक बोलणारे प्रकाश राज यांचा पराभव झाला आहे. प्रकाश राज यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. माझ्या गालावर ही सणसणीत चपराक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये प्रकाश राज म्हणतात की, “माझ्या गालावर ही सणसणीत चपराक आहे. खूपच अस्वस्थता, ट्रोल आणि अपमानही माझ्या वाट्याला आला. मी माझं मैदान राखेन. सेक्युलर इंडिसाठी माझी लढाई अशीच सुरु राहणार आहे. माझ्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली आहे. जे जे माझ्या या प्रवासात माझ्या सोबत होते त्यांचे सर्वांचे धन्यवाद. जय हिंद”

प्रकाश राज यांना अत्यंत कमी मतं मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे रिझवान अर्शद यांना तुलनेत चांगली मतं मिळाली आहेत. प्रकाश राज यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रकाश राज यांनी भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष नसल्याचं म्हटलं होतं. कन्हैय्या कुमार आणि आम आदमी पार्टी यांच्यासाठीही प्रकाश राज यांनी प्रचार केला होता.

प्रकाश राज यांनी अनेकदा सोशल मीडियातून भाजपावर टीका केली आहे. कलाकरांची आणि विचारवंतांची समाजात होणाऱ्या गळचेपीवर बोट ठेवतही त्यांनी मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढले होते. मी भाजपावर टीका करतो म्हणून मला कोणी काम देत नाही असंही ते म्हणाले होते.