‘गर्व से कहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा ‘विजय’ झाला : नीलम गोऱ्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघात अतिशय चुरशीची लढत झाली. या मतदार संघात एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलिल विजयी झाले. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी वंचित बहुजन आघाडीवर तसेच जलील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा विजय झाला आहे’ अशी जळजळीत प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. त्या निवडणुकांबाबत माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी पुढ़े बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना वंचित बहुजन आघाडीचे जरी सांगण्यात येत असले तरी ते एमआयएम या पक्षाकडून उमेदवार होते. त्यामुळे त्यांना वंचित बहुजन आघाडीचे म्हणता येणार नाही. औरंगाबाद मध्ये ‘गर्व से काहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा विजय झाला आहे. यावेळी पुढे बोलताना मराठवाड्यात रजाकारांच्या विरोधात मुक्तिसंग्रामात अनेक पिढ्या उतरल्या होत्या, या पिढ्यांना लोकशाहीच्या मार्गाने नेस्तनाबूत करण्याचं काम औरंगाबादच्या जनतेकडून घडवून आणले गेले आहे. अशी खोचक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

औरंगाबादेत इम्तियाज जलिल विजयी

अनेक नाट्यमय घडामोडींमुळे गाजलेल्या औरंगाबाद मतदार संघात शेवट्पर्यंत चुरशीची लढत झाली. तिरंगी झालेल्या या लढतीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचे मताधिक्य घटले व त्यांना ४,४९२ मतांनी पराभव पत्करावा लागला.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एकूण मतदार १८ लाख ८४ हजार ८६६ मतदार आहेत. त्यापैकी एकूण ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ५९. ४५% टक्के मतदान झाले होते. त्यापैकी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना ३ लाख ९० हजार ०४२ इतकी मते मिळाली. तर शिवसेनेच्या खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मते मिळाली. हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ५५० मते मिळाली तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना ९१ हजार ७८९ मते मिळाली.

Loading...
You might also like