लोकसभेचा निकाल पाहून ‘अक्कल’ काम करत नाहीए : आझम खान

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर सपा आणि बसपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालाविषयी प्रतिक्रिया देताना सपाचे नेते आणि खासदार आझम खान यांची हतबलता दिसून आली. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले कि, उत्तर प्रदेशातील निकाल अनपेक्षित असून आमची चूक कुठे झाली, काय झाले, आपली अक्कलच काम करत नाहीए. अशा प्रकारे त्यांची उद्विग्न प्रतिक्रिया समोर आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी २०२२ च्या विधानसभेत आमची युती कायम राहील, अशी अशा देखील त्यांनी व्यक्त केली.

यावेळी भारतीय जनता पक्षाची लाट नसताना देखील भाजपाला मोठे यश मिळाले, ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत, असे आझम खान यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात तर भाजपाला अनुकूल परिस्थिती अजिबात नव्हती, तरीदेखील त्यांनी यश मिळवले.

सपा आणि बसपा यांच्या मतविभाजनाबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, याठिकाणी काही जातीय समीकरणाचे राजकारण नव्हते, तर ते मतांचे समीकरण होते. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रित बैठक घेऊन यावर विचार करतील. त्याचबरोबर युती तुटण्याचे कोणतेही कारण आमच्याकडे नाही, त्यामुळे आमची युती २०२२ पर्यंत अशीच राहणार आहे. मायावती आणि अखिलेश यादव यांच्यात कोणत्याही विषयावर मतभेद नाही, त्यामुळे युती तुटण्याचा प्रश्नच येत नाही.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले कि, मोदींनी दुसऱ्याला देशद्रोही आणि स्वतःला देशभक्त म्हणणे हा विचित्र प्रकार आहे. यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपल्या विजयाबद्दल बोलताना ते म्हणाले कि, सर्व विरोधात असताना मी हा विजय मिळवला आहे. त्यामुळे सगळे एका बाजूला असताना मी कशा प्रकारे विजय मिळवला हे माझे मलाच माहित, अशा भावनिक प्रकारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.