राजू शेट्टीच्या स्वबळाच्या तयारीने शरद पवारांच्या अडचणीत वाढ

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिसादाची वाट पाहून राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील नऊ मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या तयारीत असून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर राज्याचा दौरा करून मतदारसंघाची पाहणी करत आहेत. तर माढ्यात स्वाभिमानाने निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार असणारा शेतकरी वर्ग हा स्वाभिमानीच्या बाजूने जाऊन शरद पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

राजू शेट्टी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे चार जागांची मागणी केली आहे. त्यात हातकणंगले, बुलढाणा, वर्धा आणि अमरावती या चार जागांचा समावेश होतो. त्यावर काँग्रेस आघाडीने कसलाही प्रतिसाद दिला नाही. म्हणून आता राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील नऊ मतदार संघात स्वबळावर निवडणूक लढवण्याची सुरुवात केली आहे. माढा, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, शिर्डी, बुलढाणा, वर्धा, धुळे, नंदुरबार या नऊ मतदारसंघात स्वाभिमानी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.

रविकांत तुपकर हे सध्या या नऊ मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करत असल्याची माहिती समोर येते आहे. हातकणंगलेतून स्वतः राजू शेट्टी, बुलढाण्यातून प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, वर्ध्यातून माजी मंत्री सुबोध मोहीत अशी नावे सध्या अंतिम झाली आहेत. यामुळे काँग्रेस आघाडी समोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वतःला सुद्धा स्वाभिमानीच्या स्वबळाच्या पावित्र्याचा फटका बसणार आहे असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.