वंचित बहुजन आघाडीला मिळणार ‘एवढ्या’ जागा : रामदास आठवले

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकांचा आता एकच टप्पा शिल्लक राहिला आहे. जवळपास ८० टक्के जागांवरील मतदान पार पडले असून महाराष्ट्रात देखील मतदान पार पडले आहे. महाआघाडी आणि महायुती प्रमाणेच राज्यात वंचित बहुजन आघाडीने देखील जोरदार प्रचार करत निवडणूक लढवली आहे, मात्र स्वबळावर निवडणूक लढविलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रातून एकही उमेदवार निवडून येणार नाही, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर रामदास आठवले आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड आहे या वक्‍तव्याचीही आपल्या शैलीमध्ये खिल्ली उडवली. यावेळी बोलताना ना. आठवले म्हणाले, कि काँग्रेस -राष्ट्रवादी आणि भाजप -शिवसेना या दोन आघाड्यांव्यतिरिक्त कोणत्याही तिसऱ्या आघाडीला मतदान करण्याची लोकांची मानसिकता नाही. पुढे बोलताना आठवले म्हणाले कि, यापूर्वी १९९६ ला आम्ही अशीच तिसरी आघाडी केली होती. त्यावेळी लोकसभेच्या ११ जागा लढविल्या होत्या. परंतु एकही जागा निवडून आली नाही. आमच्या उमेदवारांना १ ते २ लाखांपर्यंत मते मिळाली. निवडून येण्यासाठी चार ते पाच लाख मते लागतात ती आम्हाला मिळू शकत नाही, त्यामुळे प्रस्थापित पक्षांबरोबर आघाडीत जाऊन सत्तेत जाता येते.

शरद पवारांच्या वक्‍तव्याची खिल्ली

घड्याळाला मतदान केले की कमळाला मतदान जात असल्याचे आपण पाहिले आहे, या शरद पवारांच्या वक्तव्याची देखील त्यांनी यावेळी खिल्ली उडवली. त्यांच्या खास शैलीत ते म्हणाले कि, पवार यांच्या वक्‍तव्याशी मी सहमत असून जसे कमळाला मतदान केले की घड्याळाला जात होते तसेच आता घड्याळाला मतदान केले की कमळाला जात असेल.