Satara News : जॅक टाकून लुटमार करणारी टोळी गजाआड

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  सातारा-फलटण जाणाऱ्या मार्गावर प्रसाद स्टोन क्रशरजवळ असणाऱ्या निर्जन खिंडीत काही दिवसांपासून ट्रक चालकांना रस्त्यावर लाल रंगाचा जॅक ठेवून त्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार घडत होते. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून लोखंडी कोयता, लाकडी दांडके, मिरची पुड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर लोखंडी रॉड अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी याची गोपनीय माहिती काढली. त्यानुसार गुरुवारी (दि.11) रात्री या रस्त्यावरील प्रसाद स्टोन क्रशर लगत जॅक व संशयित इसम असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने लोणंद पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचूला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन अटक केली.

या प्रकरणी पोलिसांनी रामदास बापू काळे, पिंटू शहाजी काळे, तानाजी अशोक काळे, सचिन अशोक काळे (सर्व रा. पारा जि. उस्मानाबाद) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला रिमांड होमला दाखल करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी ऊसतोडीसाठी आले असून दिवसभर मजुरी करुन रात्री लुटमार करत होते. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे वाहन चालकांमध्ये घबराटीचे वातावरण होते.

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक फौजदार बी.ए. वाघमोडे, पोलिस हवालदार महेश सपकाळ, अविनाश नलावडे, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, श्रीनाथ कदम, संतोष नाळे, सागर धेंडे, अभिजीत घनवट, केतन लाळगे, फैय्याज शेख, अमोल पवार, शशीकांत गार्डी, ज्ञानेश्वर साबळे, नाना होले, अनिल भोसले यांच्या पथकाने केली.