महिला पोलीस मोनाली जाधवला राष्ट्रीय धनुर्विद्येत दोन सुवर्ण, एक कांस्य पदक

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – बुलढाणा पोलिस दलात कार्यरत महिला पोलीस शिपाई मोनाली जाधव हिने रांची (झारखंड) येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील धनुर्विद्या क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकाविले आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिची चिन येथे होणाऱ्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

नुकत्याच रांची (झारखंड) येथे सातव्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. राष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस शिपाई मोनाली जाधव हिने नागपूर या ठिकाणी पोलिस अ­ॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. कंपाऊड या धनुर्विद्या प्रकारात ५० मिटर अंतर वैयक्तीक स्पर्धेत सर्वात जास्त गुणांकन घेऊन तिने देशातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. तर एकूण गुणांकनामध्ये अग्रेसर असल्याने तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.

तसेच दुसऱ्या प्रकारात ५० मिटर अंतर स्पर्धेत तिला कांस्य पदक मिळाले. देान सुवर्ण व एक कांस्य पदक प्राप्त करून या स्पर्धेवर तिने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे चिन येथे होणाऱ्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. तिच्या यशामुळे बुलडाणा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.