मास्तराची कमाल ! 23 वर्षात पगार मिळाला 36 लाख, पठ्ठ्यानं 24 शहरांमध्ये घेतली कोट्यावधीची संपत्ती

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाकडे सव्वापाच कोटींची संपत्ती आढळून आली आहे. हा आश्चर्यकारक खुलासा लोकायुक्त भोपाळच्या दहा सदस्यीय टीमच्या चौकशीत झाला आहे. मंगळवारी ही चौकशी करण्यात आली होती. टीमने सकाळी सहा वाजता प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज रामजन्म श्रीवास्तव यांच्या अनेक ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली.

या ठिकाणांमध्ये भोपाळच्या मिनाल रेसीडेन्सी येथील घर नंबर डी 413 आणि सारणी-बगडोनामध्ये एमजीएम कॉलनीच्या घरांचा समावेश आहे. या छापेमारीतून पंकजची बैतूल, छिंदवाडा, भोपाळ आणि नागपुरमध्ये 24 पेक्षा जास्त प्रॉपर्टी असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये समरधामध्ये प्लॉट, पिपरिया जाहिरपीरमध्ये एक एकर जमीन, छिंदवाडामध्ये सहा एकर जमीन, बैतूलमध्ये आठ निवासी फ्लॅट, बगडोनामध्ये सहा दुकाने आणि दहा विविध गावांमध्ये एकुण 25 एकरच्या कृषी जमीनीचा समावेश आहे.

पंकज घोडाडोंगरी तालुक्यातील रेंगाढानामधील एका प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. सध्या पंकजच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. पंकजविरूद्ध उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आणि भ्रष्टाचार निवारण नियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पथकाने केलेल्या छापेमारीत समजले की, पंकज परिसरातील गरजू लोकांना मोठ्या व्याजदराने कर्ज देत होता आणि त्यांची संपत्ती गहाण ठेवत होता. कर्ज घेणारा कर्ज फेडू शकला नाही तर पंकज त्यांची संपत्ती आपल्या नावावर करत होता. पंकजने आपल्या सोबत श्रीराम आयटीआय संस्थेच्या बांधकामात सुमारे 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

लोकायुक्त अधिकारी डॉक्टर सलिल शर्मा यांचे म्हणणे आहे की, पंकज यांनी 1998 मध्ये शिक्षण विभागात 2,256 रुपयांच्या पगारावर नोकरी जॉईन केली होती. सध्या पंकजचे वेतन सुमारे 40,000 रुपये प्रति महीना आहे. लोकायुक्त अधिकार्‍याने सांगितले की, 23 वर्षाच्या नोकरीत पंकजला 36,50,500 रुपयांचे वेतन मिळाले.

अधिकार्‍याने सांगितले की, या वेतनातून त्याने कोट्यवधीची संपत्ती कशी बनवली, हा तपासाचा विषय आहे. अधिकार्‍याने सांगितले की, उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब होईल, पंकजकडून रोकड जास्त जप्त झालेली नाही. पंकजचे वडील वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडमध्ये पाथाखेडा सर्वेयर होते. पंकजने सांगितले की, त्यांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळाली होती.