कुटुंबीयांनी सकाळी केले ‘अंत्यसंस्कार’, संध्याकाळी ‘जिवंत’ परत आली ‘ती’ व्यक्ती, जाणून घ्या काय प्रकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर एखाद्या कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्यावर अंत्यसंस्कार केले आणि जर तो संध्याकाळपर्यंत परत येत असेल तर काय होईल? होय, अशीच एक आश्चर्यकारक घटना मध्य प्रदेशातील श्योपुरमधून समोर येत आहे. जिथे एका कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्याचे अंत्यसंस्कार केले परंतु तो व्यक्ती जिवंत परत आला. ते पाहून पोलिस व कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले तेव्हा प्रत्येकजण थक्क झाले.

खरं तर, बडोद्याच्या माताजी मोहल्लाची ही घटना आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता शहरातील पुल गेट स्मशानभूमीजवळ पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृत व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जेणेकरुन त्याची ओळख पटेल. शुक्रवारी सकाळी व्हायरल फोटो पाहून बडोद्याच्या बंटी शर्मा याने मृत व्यक्तीला 4-5 दिवसांपासून बेपत्ता असलेला आपला भाऊ दिलीप शुक्ला असल्याचे सांगितले. बंटी शर्माने सांगितले की, दिलीप मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे.

यानंतर बंटी शर्माने मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. पोलिसांनी पंचनामासह इतर कागदपत्रांची कारवाई पूर्ण केली. दिलीप शुक्लाला मृत समजून त्याच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी सकाळी त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. परंतु रात्री आठ वाजता दिलीप घरी परतला, ते पाहून शेजारीच नव्हे तर कुटुंबियांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

अंत्यसंस्कारानंतर आपल्या भावाला जिवंत पाहून घरात पसरलेली भयाण शांतता आनंदात बदलली. परंतु अज्ञात व्यक्तीची ओळख पटवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याने पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने कुटुंबातील सर्व सदस्य आता कॅमेर्‍यासमोर येण्यास घाबरत आहेत. दिलीपच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की फोटो आणि हुलियाच्या आधारे ओळख पटविण्यात चूक झाली आहे. त्याचबरोबर पोलिस आपल्या कारवाईला न्याय्य असल्याचे सांगत आहे. त्याचवेळी अज्ञात मृतदेहाच्या फोटोच्या मदतीने पुन्हा नव्याने ओळख पटविली जात आहे.

सध्या अज्ञात व्यक्तीचे कुटुंब ओळख पटविण्यासाठी येत आहे. असे सांगितले जात आहे की, ज्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला तो भेला भीम लत गावचा रामकुमार आदिवासी होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याचे कुटुंब शहर कोतवाली येथे पोहोचेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता त्यांना मृतदेहाची राख देण्यात येईल. त्याचवेळी या विचित्र घटनेची चर्चा दूरदूरपर्यंत सुरू आहे की अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात इतकी मोठी चूक कशी झाली.