लशींचे दोन्ही डोस घेऊन, शरीरात अँटीबॉडीज् असूनही कोरोनाबाधित; डॉक्टरही हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कोरोनावरील लसीकरण केले जात आहे. मात्र, या लसीकरण अभियानात मध्य प्रदेशच्या धार भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या लसीकरण केंद्रावर एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याने कोरोना लशींचे दोन डोस घेतले होते. मात्र, हे डोस घेऊनही संबंधित महिला कर्मचारी कोरोनाबाधित आढळली आहे.

आरोग्य कर्मचारी महिलेने दोन्हीही डोस घेतले. तिच्या शरीरात अँटिबॉडीजचा स्तरही चांगला होता. तरीही ती महिला कोरोनाबाधित आढळल्याने डॉक्टरही चांगलेच चिंतेत आले आहे. ही महिला आरोग्य कर्मचारी धार येथील आहे. तिचे वय 30 वर्षे आहे. तिने कोरोना लशींचे दोन्हीही डोस घेतले होते. मात्र, तरीही ती कोरोनाबाधित आढळली. या महिला कर्मचाऱ्याने 17 जानेवारीला कोरोनाची पहिली लस घेतली होती. त्यानंतर 22 फेब्रुवारीला दुसरी लस घेतली. या महिलेला 26 फेब्रुवारीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर टेस्ट केली असता तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

दुसरा स्ट्रेन तर नाही ?
महिला आरोग्य कर्मचाऱ्याला दोन डोस दिले गेले आहेत. तिच्या शरीरातील अँटिबॉडिजचा स्तरही चांगला आहे. तरीदेखील ती कोरोनाबाधित आढळल्याने डॉक्टरही हैराण झाले आहे. हा एक वेगळाच प्रकार असल्याचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. अनिल वर्मा यांनी म्हटले आहे. अँटीबॉडिज् आणि कोरोना आढळणे ही आश्चर्यकारक बाब आहे. त्यामुळे हा दुसरा स्ट्रेन तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.