10 वी, 12 वी च्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याच दरम्यान होणाऱ्या विविध अभ्यास क्रमांच्या परीक्षांवर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे. कोरोना काळात होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. या मुद्यावर मागील काही दिवसांपासून चर्चा होत आहे. मात्र, आता ठरलेल्या तारखेलाच परीक्षा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांबरच्या बैठकीत याबाबत चर्चा सुरु आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे 10 आणि 12 वीच्या परीक्षा होणार की नाही, या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या. मात्र, आता या परीक्षा ठरल्याप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 29 एप्रिलला दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होणोर आहे. या परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 16 लाख विद्यार्थी बसणार आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थी बसणार आहेत. बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य होणार नाही, ही यंत्रणा उभी करण्यासाठी किमान दोन वर्षाचा कालावधी लागेल असे मत आयटी कंपन्यांनी व्यक्त केले आहे. परीक्षा तयारी बाबत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींसोबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज चर्चा करत आहेत. दरम्यान परीक्षा पुढे ढकलू नका अशी मागणी ग्रामीण भागतल्या लोकप्रतिनिधींनी केली आहे. या बैठकीत परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एसओपी जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.