पक्ष बांधणी आणि राज ठाकरेंची ‘तोफ’ यावरूनच ठरणार मनसेच्या इंजिनाचा प्रवास

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – मनसे पुण्यातील आठ पैकी पाच जागा लढवत आहे एकेकाळी २९ नगरसेवक असलेल्या पुण्यामध्ये मनसे अवघ्या २ नगरसेवकांवर आली होती मात्र त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आणि जोरदार मोर्चेबांधणी केली, मनसेने स्थानिक पातळीवर केलेली कामे आणि कारकर्त्यांचे विणलेले जाळे यामुळे या निवडणुकीमध्ये चांगला फायदा होईल असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले आहे.

या निवडणुकीमध्ये पक्ष नेते बाबू वागस्कर, रणजित शिरोळे, बाळा शेडगे, गणेश सातपुते यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नियोजनाची जबाबदारी स्विकारलेली आहे. दररोज रात्री सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची एकत्र समन्वय बैठक होते. या बैठकीमध्ये दिवसभरातील कामकाज, प्रचार यंत्रणा आणि नियोजनासंदर्भात झालेल्या चर्चेनुसार दुसऱ्या दिवशीचे नियोजन केले जाते. त्याचाही चांगला फायदा या निवडणुकीमध्ये झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नागरिकापर्यंत थेट पोहचण्याचा यावेळी मनसे उमेदवारांनी प्रयत्न केला आहे. त्यासाठी छोट्या पदयात्रा आणि रॅली देखील काढल्या असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंनी यावेळी कोथरूड, हडपसर भागात विशेष लक्ष देऊन प्रचारसभा घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या प्रचारसभांची धार देखील यावेळी निवडणुकीत पहायला मिळाली आहे. अनेक दिवसांपासून मनसेने पुण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे काम सुरु केले होते त्याचाच फायदा आता या निवडणुकीमध्ये पक्षाला होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.