‘महाविकास’ सरकार पडणार नाही, भाजपात असताना मी देखील असे उद्योग केले : खडसे

पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला दूर ठेवत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार आणण्याचा चमत्कार केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ३२ पक्षांचा ट्रक पाच वर्षे यशस्वीपणे चालवला. मग तीन पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा का चालणार नाही, असे सांगत महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असा विश्वास देखील माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी खडसे बोलत होते.

माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव म्हणाले…

मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा केली की, तुम्ही राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला? भाजप मी सोडली नाही, तर मला भाजपने अक्षरशः बाहेर ढकलले. भाजपने मला पक्ष सोडायला भाग पाडले. अशा परिस्थितीत बहुजन समाजाला खऱ्याअर्थाने न्याय देणारे शरद पवारच आहेत. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मैलाचे दगड ठरतील, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम शरद पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील.

भाजपत असताना मी ही असे उद्योग केले आहेत खडसे म्हणाले…

भाजप आपले आमदार सांभाळण्यासाठी हे सरकार पडणार असल्याचे उद्योग करत आहे. मीही तिकडे भाजपत असताना असे उद्योग केले आहेत. आमदार सांभाळण्यासाठी तसे करावेच लागते, अशी पुष्टीही खडसे यांनी जोडली. महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षाचे रिक्षा सरकार म्हणून भाजपचे नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. मग अटलजींनी तर ३२ पक्षांचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते. तर मग तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार का सक्षमपणे चालणार नाही.