25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

पोलिसनामा ऑनलाईन टीम : राज्यातील ६ हजार ग्रामपंचायती भाजपा जिंकेल असा दावा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही धक्का बसल्याचं चित्र आहे. मात्र या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं आहे. राज्यात ग्रामपंचायतीचे निकाल येऊ लागले आहेत, या निकालात सत्ताधारी विरोधात महाविकास आघाडी असंच चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहरी भागातून मोर्चा वळवून मनसेने ग्रामपंचायत पातळीवर निवडणुका पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात लढल्या, त्यात मनसेला यश आल्याचं दिसून येत आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुलनेत मनसेला कमी जागा मिळालेल्या आहेत. तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत.

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात शिरपूर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ७ पैकी ६ सदस्य निवडून आले आहेत. रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी ७ पैकी ५ जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. याठिकाणी ९ पैकी ७ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे.

औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने ७ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. रायगडच्या जोहे येथे मनसेचा १ उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. अजूनही राज्यात ठिकठिकाणी मनसेप्रणित आघाडीचे उमेदवार जिंकल्याची माहिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पत्रक काढत कार्यकर्त्यांना ताकदीनं निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते. आता आगामी महापालिका निवडणुकीतही मनसेला यश मिळणार का? हे पाहणं गरजेचे आहे.