Lockdown in Maharashtra : राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केले आहेत. वाढती बाधितांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत लागू करण्यात आला आहे. तर राज्य सरकार १५ मे च्या लॉकडाऊनमध्ये वाढ करणार का निर्बंध शिथिल करणार याबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनवरून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी महत्वाचे संकेत दिले आहेत. यावरून महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाने कहर केला आहे. दैनंदिन बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडीसीवीर, लस, याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात जरी १५ मे पर्यंत लॉकडाऊन असला तरी कोरोनाची परिस्थिती पाहता ११ जिल्ह्यांनी १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यातील लॉकडाऊन बाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये काही गोष्टींना सूट द्यायची की नाही यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

केंद्र सरकारकडून कोविशिल्डचे १६ लाख डोस येणे बाकी आहे. मात्र लस उपलब्थ होत नसल्याने राज्य सरकारने खरेदी केलेले ३ लाख डोस आता ४५ वर्षावरील व्यक्तींना दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबण्याचे संकेत राजेश टोपेंनी दिले आहे. पुढे टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. उद्याच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.