‘सत्य घायल हुआ है, मगर कभी हारा नही हैं ’, ‘वादग्रस्त’ IAS अधिकारी निधी चौधरींनी कवितेतून मांडली ‘व्यथा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याने चर्चेत आलेल्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी फेसबुकवर एक कविता शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. सत्य जखमी झालं आहे पण सत्याचा कधी पराभव झालेला नाही. आज जर महात्मा गांधी असते, तर कदाचित माझ्यासोबत तेदेखील रडले असते, असं मत त्यांनी मांडल आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत निधी चौधरी यांची मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्तपदावरुन मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. निधी चौधरी यांची मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात उपसचिवपदावर बदली करण्यात आली आहे. तसेच त्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. यामुळे दुखावलेल्या निधी चौधरी यांनी फेसबुकच्या माध्यमातून कविता शेअर करत संपूर्ण घटनेवर आपली व्यथा मांडली असून रोष व्यक्त केला आहे. सत्य घायल हुआ है, मगर कभी ना हारा है…..आज अगर बापू होते, शायद मेरे संग संग रोते असं त्यांनी कवितेतून त्यांनी सांगितलं आहे.

निधी चौधरी यांच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये सर्वांनीच निधी चौधरी यांना समर्थन दिलं असून राजकारणासाठी तुमचा वापर करण्यात आल्याचं म्हटलं आहे.पत्रकार परिषद बोलावली होती तर मला फोनदेखील केला असता. फोन नाही तर किमान पुन्हा एकदा व्यंग तरी वाचायला हवं होतं. जर इतकं करु शकत नव्हतात तर काही लोकांना तरी विचारायचं. कदाचित तेव्हा तुम्हाला व्यंग कळलं असतं असंही त्यांनी कवितेत म्हटलं आहे.
माझी निंदा करणाऱ्यांनो सत्याचा अद्याप पराभव झालेला नाही, एक दिवस तुमचं कडवट मत बदलेल असा विश्वासही त्यांनी कविवेतून व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण

१७ मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे ट्विट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले आणि नवीन ट्विट्सद्वारे आपली बाजू मांडली.

निधी चौधरी यांचं स्पष्टीकरण

काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही २०११ पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. माझे ट्वीट व्यंगात्मक होते. आंदोलन करणाऱ्यांनी ते पूर्ण वाचलेले नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. गांधीजींवर माझी अपार श्रद्धा आहे. माझ्याकडून त्यांचा अवमान होणे शक्यच नाही. गांधीजींवर यापूर्वी मी अनेकदा ट्वीट केले आहे, ती पाहू शकता. गांधीजी या देशात जन्माला आले, याबाबत आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, असे ट्वीट मी यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे गांधीजींची हत्या करणाऱ्याचे समर्थन मी कधीच करणार नाही. काही लोक या ट्वीटचा राजकीय लाभ उठवू पाहात आहेत, हे दुर्दैवी आहे. गांधीजींचा अवमान करण्याचा मी स्वप्नातही विचार करु शकत नाही. असं स्पष्टीकरण निधी यांनी आपल्या विविध ट्विटमध्ये दिलं.