मुंबईत सांगायला सामान्यांसाठी ‘लोकल’ सुरु; प्रवाशांकडून स्वागत, वेळेची मर्यादा दूर करण्याची मागणी

मुंबई : मुंबईची रक्तवाहिनी म्हटल्या जाणारी लोकल सेवा आजपासून सर्वसामान्यांसाठी सुरु झाली, पण पहिल्याच दिवशी प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. जवळपास सर्वच स्टेशनवर प्रवाशांच्या रांगाच रांगा पहायला मिळाल्या. मात्र, एक किंवा २ तिकीट खिडक्या उघड्या असल्याने अनेकांना २ तास रांगेत थांबूनही तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना आता पुन्हा बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.

 

 

 

 

 

आजपासून मुंबईतील लोकल सामान्यांसाठी सुरु करण्यात आली. पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ आणि रात्री ९ नंतर शेवटच्या लोकलपर्यंत सामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आज पहाटेपासून कर्जत, कसारा, नाला सोपारा, वसई रोड पासून सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली होती. परंतु, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेन अगोदरच जादा तिकीट खिडक्या उघड्या राहतील अशी व्यवस्था केली नाही. त्यामुळे सर्वच स्टेशनबाहेर लांबच लांब रांगा दिसत होत्या. किती रांग आहे, हे न पाहता सकाळी ७ वाजता सर्व तिकीट खिडक्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेकांना २ -२ तास रांगेत उभे राहूनही तिकीट न मिळाल्याने आता ऑफिसला जाण्यासाठी बसचा पर्याय शोधावा लागणार आहे. त्यावर अनेक प्रवाशांनी टिका केली. सरकारने मुभा दिली पण रेल्वेच्या कारभारामुळे आम्ही आज प्रवास करु शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली.