‘या 3 दिवसात काहीही गडबड केली जाऊ शकते’ : प्रकाश आंबेडकर

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात 21 ऑक्टोबर रोजी 288 जागांवर निवडणुका होणार आहेत. 21 तारखेनंतर 3 दिवसांत म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या तीन दिवसांत काहीही गडबड होऊ शकते असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या 3 दिवसांच्या अंतरावर आक्षेप घेतला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे याचे आम्ही स्वागतच करतो. परंतु मतदान आणि मतमोजणी यांच्यात 3 दिवसांचे अंतर आहे. या 3 दिवसांत काहीही गडबड केली जाऊ शकते. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजी करण्याची मागणी करणार आहोत.” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजू शेट्टींना वंचितमध्ये स्थान नाही , अन्य अपक्ष उमेदवारांना वंचितचा पाठिंबा नसणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचितवर आरोप केला आहे की, वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे. या आरोपाचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेस राष्ट्रवादीचा हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आमच्यावर आरोप करण्यासाठी त्यांनी सत्तधाऱ्यांशी सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बहुजन वंचित आघाडीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना कोणतेही स्थान असणार नाही. अन्य अपक्ष उमेदवारांना देखील पाठिंबा असणार नाही. परंतु मित्र पक्षासाठी मात्र आम्ही आवश्यक त्या ठिकाणी जागा सोडू.” असे त्यांनी स्पष्ट केले.

आवाडेंशी बंद खोलीत चर्चा

माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि प्रकाश आंबेडकर यांची इचलकरंजीत भेट झाली. दोघांमध्येही बंद खोलीत 20 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आले नसले तरी, प्रकाश आवाडे यांनी सांगितले की, या भेटीत राजकीय स्थितीबद्दल औपचारिक चर्चा झाली आहे.

Visit : Policenama.com