आम्हाला पराभव मान्य नाही ; नारायणे राणे यांनी व्यक्त केली शंका

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही हरलो तरी आम्हाला पराभव मान्य नाही, तळकोकणात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं संशयास्पद आहे, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निलेश राणे यांचा हा सलग दुसरा पराभव आहे. यांमुळे नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या निकालावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. मतमोजणीच्या सर्व फेऱ्यात ७ ते ८ हजारांचा फरक कसकाय येतो असा प्रश्न राणे उपस्थित करत आहेत.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निलेश राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. विनायक राऊत यांनी तब्बल १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी निलेश राणेंचा पराभव केला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आखली होती. गेल्यावेळेस निलेश राणे यांनी या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तेव्हाही विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. एकेकाळी नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात राणे यांचे वर्चस्व संपत चालले आहे. गेल्यावेळेस नारायण राणे यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.