कागदी पिशव्या तयार करण्यातून रोजगार उपलब्ध – निशा पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे रोजगार मिळेल, घरच्या घरी काम करता येईल आणि कागदी बॅग वापरल्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन कचऱ्यात टाकताना कागदाच्या पिशवीत रॅप करावे आणि रेड डॉट टाकले, तर कचरा विलगीकरण करताना महिलांना त्रास होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे भारती विद्यापीठातील प्रा. निशा पाटील यांनी सांगितले.

जागतिक महिला दिन व सावित्राबाई फुले पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व प्रियांका टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वतीने महिलांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विद्याविकास मंदिर शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रियांका टेक्निकलच्या संचालिका संगीता खैरनार यांनी महिलांना कागदा कटिंग करून वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या तयार करण्याचे योग्य मार्गदर्शन दिले. त्यातून महिलांना रोजगार मिळण्यास मदत होईल. दरम्यान, दीपाली घाडगे, मनीषा मुरुडकर यांनीही मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रियांका टेक्निकलच्या अध्यक्षा इंदिरा रमेश अहिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अहिरे म्हणाल्या की, कोविड-19 च्या काळात अनेक महिलांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल आणि घरामध्ये बसून उद्योग करता येईल.

या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक विजय मोहिते यांचे सहकार्य लाभले. सुमन सातपुते यांनी आभार मानले