निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी ‘कॉलेजियम’ पद्धत असावी ; ममता बॅनर्जी यांची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रमाणे कॉलेजियम पद्धतीने निवडणूक आयुक्तांचीदेखील नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीका केली. ममता यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाचे तीन नियुक्त सदस्यांना मतदानाचा पूर्ण अधिकार नसला पाहिजे.

ममता यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयात असलेल्या कॉलेजियमकडून न्यायाधीशांच्या नियुक्त्या केल्या जातात. यांमुळे निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी देखील कॉलेजियम पद्धत असली पाहिजे.

काय आहे कॉलेजियम ?

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती आणि बढती संबंधी विषयामध्ये निर्णय घेण्यासाठी पाच वरिष्ठ न्यायाधीशांची समिती तयार केली जाते. या समितीला कॉलेजियम म्हटले जाते. समिती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बढती संबंधी निर्णय घेते आणि सरकारकडे पाठवते. सरकार कॉलेजियमचा निर्णय सुरवातीला फेटाळू शकते परंतु कॉलेजियमने पुन्हा तोच निर्णय कायमस्वरूपी ठेवल्यास सरकार तो निर्णय फेटाळू शकत नाही. सरकार कॉलेजियमचे निर्णय मान्य करून राष्ट्रपतींकडे पाठवते. यानंतर राष्ट्रपतींकडून न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते.