भंडारा : आईचा मृत्यू झाला आणि रोजगार गेला, नैराश्यातून एका युवकाची आत्महत्या

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील खात रोड परिसरातील युवकाने वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केलीय. हि घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून सारंग देशमुख (वय 39) असे मृताचे नाव आहे.

शहरापासून नजीक असलेल्या वैनगंगा नदीत पहाटेपासून पोहणारे आणि नदी काठावर व्यायाम करणार्‍यांची गर्दी असते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नदीच्या पाण्यात मृतदेह पोहणार्‍यांना आढळला. याबाबत त्यांनी कारधा पोलिसांना माहिती दिलीय. कारधा पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर भंडारा पोलिसांना माहिती दिली आहे.

नदीतील मृतदेह काठावर आणला. तेव्हा खातरोड परिसरातील लक्ष्मीनगर येथील सारंग प्रभाकर देशमुख याचा मृतदेह आहे, अशी ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांना सूचना देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.

मयत युवक केबल ऑपरेटरजवळ सहायक म्हणून काम करत होता. मात्र, कोविड परिस्थितीत त्याच्या आईचा मृत्यू झाला आणि रोजगार गेला. या नैराश्यातून त्याने बुधवारी वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. याची भंडारा पोलिसांत नोंद केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

गोसेखुर्द धरणामध्ये पाणी अडविण्यात आल्यापासून शहराजवळीत वैनगंगा नदीचे पात्र आत्महत्या करण्याचे केंद्र ठरलंय. नदीच्या पात्रात बर्‍याच अधिक प्रमाणात बॅकवॉटर आहे. नवीन आणि जुन्या अशा दोन्ही पुलाजवळील पात्रात उडी घेऊन आत्महत्या करणार्‍यांची संख्या वाढलीय.