म्हणून त्याने काढली स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा

शेवगाव (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन – शेवगाव शहरातील स्मशानभूमीतील अस्वच्छतेच्या मुद्दयावर शेवगाव येथील कम्युनिष्ट पक्षाचे कॉ.संजय नांगरे यांनी आपली जिवंत पणे अंतयात्रा काढली आहे. स्वतःचीच जिवंतपणे अंत्ययात्रा काढून नांगरे यांनी अनोखे आंदोलन केल्याने शहरवासीयांचे या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले आहे. स्मशान भूमीत घाणीचे साम्राज्य पसरले असून दुःखी अंतःकरणाने येथे येणाऱ्या लोकांना येथील घाणीचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाला नसून येत्या काळात या प्रश्नावर तीव्र आंदोलन करणार असल्याचे नांगरे यांनी या प्रसंगी सांगितले आहे.

कॉ.संजय नांगरे यांनी काढलेल्या अंत्ययात्रेत सहभागी खांदेकरी आणि इतर लोक जोर जोरात घोषणा देत असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आंदोलन यशस्वी झाले आहे. तर हे अनोखे आंदोलन बघायला रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमा झाली होती.  नगरपरिषदेच्या उदासीन कारभारामुळे शहरातील लोक जिवंतपणी मरण यातना भोगत आहेत अशा नगरपरिषदेला खडबडून जागे करण्यासाठी आम्ही हि जिवंतपणी अंत्ययात्रा काढली आहे असे कॉ. नागरे म्हणाले. त्यांना खांदा देण्यासाठी त्यांचे कार्यकर्तेच खांदेकरी झाले होते. तर या अंत्ययात्रेत सामान्य नागरिकांनीही सहभाग नोंदवला होता.

नगरपरिषदचे शहर असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मोकाट जनावरांनी शहरात हैदोस मांडला आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांड पाण्याचे व्यवस्थापन नीट नाही. तसेच स्मशानभूमीत पाणी पुरवठा आणि वीज  नाही तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे अशा समस्या येथील नागरिकांनी सांगितले आहे.

शहरात स्वच्छता ठेवण्यात यावी. स्मशान भूमीत आणि कब्रिस्तानमध्ये वीज पाणी स्वच्छता या गोष्टींची पूर्तता करण्यात यावी. स्मशान भूमीच्या संरक्षक भिंती बांधून घ्याव्यात आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास निलंबित करण्यात यावे अशा मागण्या कॉ.संजय नांगरे यांनी आपल्या अंत्ययात्रा आंदोलना दरम्यान केल्या आहेत. सोमवार पर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत रस्ता रोखो  करणार असल्याची पूर्व सूचना आज संजय नांगरे यांनी आंदोलना दरम्यान दिली आहे.आंबेडकर चौकातून सुरु झालेली   प्रतिकात्मक अंत्ययात्रा क्रांती चौक मार्गे नगरपरिषद कार्यालयासमोर नेहण्यात आली तेथे विसावा देण्यात आल्यानंतर ती पैठण रस्त्याने अंत्ययात्रा  स्मशानभूमीत गेली तेथेच अंत्ययात्रेचा समारोप झाला.