निर्दोष युवकाला 28 वर्ष तुरूंगात ठेवलं, आता सरकारने दिली 72 कोटींची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अमेरिकेत एका कृष्णवर्णीय माणसाला त्याने न केलेल्या कृत्याबद्दल 28 वर्ष तुरूंगात बंद करण्यात आले होते. आता या व्यक्तीला सरकारकडून भरपाई म्हणून 71.6 कोटी रुपये मिळणार आहेत. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे हत्येच्या प्रकरणात चेस्टर हॉलमन नावाच्या व्यक्तीला तुरुंगात टाकले गेले होते . जेव्हा या प्रकरणाचे सत्य उघड झाले तेव्हा चेस्टरला 2019 मध्ये तुरूंगातून सोडण्यात आले.

तपासादरम्यान हे प्रकरण उघडकीस आले होते की, या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराने 1991 मध्ये खोत बोलून चेस्टरला फसवले होते. नंतर चेस्टरने चुकीच्या शिक्षेसाठी राज्य सरकारवर दावा दाखल केला. बुधवारी फिलाडेल्फिया प्रशासनाने भरपाईची रक्कम जाहीर केली. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या झालेल्या करारात सरकार किंवा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने चूक मान्य केलेली नाही.

फिलाडेल्फियाचे महापौर जिम केन्ने म्हणाले की, तोडगा ठीक आहे, पण कोणाच्याही स्वातंत्र्याची कोणतीही किंमत असू शकत नाही. त्याच वेळी, चेस्टर म्हणाला की, 28 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळवण्याचा अनुभव कडू आणि आनंददायी आहे. चेस्टर म्हणाला की, त्याच्यासारखे बरेच लोक कित्येक दशके तुरुंगात आहेत आणि फक्त सत्य समोर आणण्यासाठी दीर्घ लढा देतात.