महिलेस अश्लील संदेश, व्हिडीओ पाठवणाऱ्यास मनसैनिकांनी दिला बेदम चोप

मीरारोड – पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेस अश्लील व्हिडीओ आणि संदेश पाठवून त्रास देणा-या 22 वर्षीय तरुणास मनसैनिकांनी पकडून बेदम चोप दिला. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासून लेखी माफी मागायला लावल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. 18) घडली आहे. सिंग आडनावाचा हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील असून तो सोमवारी सकाळी उत्तर प्रदेश येथे मूळ गावी जाणार होता.

प्राप्त माहितीनुसार, काशिमीरा प्रभाग 14 मध्ये मनसेचे संपर्क कार्यालय आहे. रविवारी कार्यालयात एक महिला तक्रार घेऊन आली. एक तरुण हा आपणास अश्लील व्हिडीओ व संदेश पाठवून त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर मनसे पदाधिकारी सचिन जांभळे, सचिन साळुंके, रवींद्र शेलार, करण हरिजन आणि अविनाश शिरसाठ आदीनी त्या तरुणाशी संपर्क साधून त्याला मीरारोड येथून पकडले. त्यानंतर त्याला कार्यालयात आणून बेदम चोप दिला. मनसेच्या महिला पदाधिका-यांनी त्या तरुणाच्या तोंडाला काळे फासले. लेखी स्वरूपात त्याच्याकडून चूक झाल्याचे आणि यापुढे त्रास देणार नाही. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे व समस्त महिला वर्गाची माफी मागत असल्याचे लिहून घेतले.