स्फोटक कार आणि हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी API सचिन वाझेला पोलीस निरीक्षक सुनील मानेची ‘साथ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली होती. तपासात माने यांनीच तावडेच्या नावाने हिरेन यांना फोन करून बोलावले होते. हत्येनंतर त्याने इतर संशयितांसोबत स्वतंत्र वाहनातून प्रवास केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार व हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझे ला गुन्ह्यात व पुरावा नष्ट करण्यात मानेने मदत केल्याचा दावाही तपास यंत्रणेने केला आहे.

४ मार्चला हिरेन यांना कांदिवली गुन्हे शाखेचे (कक्ष ११) प्रभारी असलेल्या माने यांनी तावडे नावाने फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर हिरेन याना बेशुद्ध करून वाझे, विनायक शिंदे आणि नरेश गोर हे गाडीतून रेतीबंदराकडे जात होते त्यावेळी माने आपल्या वाहनातून त्यांच्या सोबत होते. नाकाबंदीत त्यांच्या वाहनांची चौकशी होऊ नये म्हणून माने त्यांच्या सोबत होता असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोटक कार प्रकरणाचा सीआययू तपास करत असताना माने हे २,३व४ मार्चला वाझेला मुंबई आयुक्तालयात येऊन भेटला होता. हिरेन यांच्या बैठकीलाही माने हजर होते. सुरुवातीला आयुक्तालयात आपण शस्त्र परवाण्याच्या संदर्भात गेल्याचे म्हंटले होते मात्र इतरांचे जबाब घेतले त्यातून ही बाब खोटी असल्याचे समोर आले आहे.