मांजरी खून प्रकरण : चौकशीसाठी गेल्यानंतर हडपसर पोलिसांनी चक्क हकलून दिलं, नातेवाईकांनी आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार, गुन्हयात शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुखाचा समावेश (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  येरवडा परिसरातून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुखासह 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर खून झालेला तरुण अखिल भारतीय सेनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष असल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, खून प्रकरणाला वेगळे वळून लागण्याची शक्यता असून नातेवाईकांनी अद्यापही मृतदेह ताब्यात घेतला नसून ज्या पोलिसांनी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेल्यानंतर चक्क हाकलून दिले त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे खून प्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे नाव आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी धनराज शंकर घुले (वय 24), सुमित सुनील घुले (वय 38), समद अत्तार अन्सारी (वय 21), धीरज शंकर घुले (21) व वैभव विष्णू रणदिवे (वय 20) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकर घुले (वय 55) यांच्यावर देखील गुन्हा दाखल असून सध्या ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. सुरेश राजू रेकुंठा (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर घुले हे पुण्याचे शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख आहेत. दरम्यान, त्यांचा मांजरी रेल्वे गेट परिसरात  बार आहे. सुरेश हा बारमध्ये गेला होता. यावेळी दारू पिताना वाद झाले आणि या वादातूनच आरोपींनी सुरेश याचा खून केला. त्याचा मृतदेह रेल्वे गेट परिसरात टाकून दिला. दरम्यान, सुरेश याच्या नातेवाईकांनी तो घरी नसल्याने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी मिसिंग दाखल करत तपास सुरू केला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, सुरेश याच्या दोन मित्रांनी पोलिसांना सुरेश आणि आम्ही बारमध्ये पार्टी करण्यासाठी गेलो होतो अशी माहिती दिली. त्यावेळी येरवडा पोलिसांनी या परिसरात येऊन सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे नातेवाईक हडपसर पोलिसांकडे धाव घेत प्रकाराची माहिती दिली.

पण, हडपसर पोलिसांनी आम्हाला सहकार्य तर केले नाहीच पण मला हाकलून दिले असे सुरेशच्या पत्नीने पोलीसनामाशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे पोलीस मिसिंगचा तपास कसा करतात, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. वेळीच पोलिसांनी तपास वेगाने केला असता तर हा प्रकार दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आला असता. नातेवाईकांनी आम्ही दोन दिवस पोलिसांकडे जात होतो. पण आम्हाला हाकलून देण्यात आले. मृतदेह सापडल्यानंतर सांगितले की सुरेश याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. मात्र शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंकर घुले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे.