Manoj Jarange Patil | मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यात मनोज जरांगेंच्या सभेला विरोध; तेजस्विनी चव्हाणांचा इशारा

सातारा : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करत राज्य सरकारला (State Govt) जेरीस आणणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या साताऱ्यातील सभेला मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाण (Tejaswini Chavan) यांनी विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे साताऱ्याचे आहेत. येथून जरांगे (Manoj Jarange Patil) यांना विरोध झाल्याने राजकीय दृष्टीने देखील या विरोधाकडे पाहिले जात आहे.

साताऱ्यातील शिवतीर्थ येथे मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. परंतु जरांगे यांनी साताऱ्यात अन्यत्र सभा घ्यावी, शिवतीर्थ येथे घेऊ नये, असा विरोध मराठा आरक्षण आंदोलक तेजस्विनी चव्हाण यांनी केला आहे. या विरोधाचे अनेक अर्थ लावले जात आहेत.

दरम्यान, तेजस्विनी चव्हाण यांनी जरांगे यांच्यावर टीका करताना म्हटले की, शिवतीर्थ येथे सभा घेण्याचा नवीन पायंडा पाडू नका. तुम्ही एवढा मोठा गड जिंकलेला नाही. मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला जरांगे लागले आहे. मराठा हा कुणबी नाही. मराठा समाजाला तुम्ही भडकवत आहात.

तेजस्विनी चव्हाण यांनी जरांगेंच्या भूमिकेलाच सुरूंग लावताना म्हटले की, मराठा समाज शेतकरी आहे असे बोलता, परंतु शेतकरी हे सर्व जातीत आहेत. विनाकारण मराठा समाजाचा बाणा, ९६ कुळी मराठ्यांचे अस्तित्व नष्ट करून तुम्ही ओबीसीमध्ये ज्या जाती आहेत त्या सर्वांना तुम्ही रोडवर आणण्याचा प्रयत्न करत आहात.

तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या, आज सगळ्या समाजातील लोक रस्त्यावर आले तर आरक्षण मिळणार कुणाला? मराठा हा समाज आहे, कुणबी ही जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० पैकी केवळ ५ टक्के कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे विनाकारण ९५ टक्के मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा जरांगेंनी प्रयत्न करू नये. (Manoj Jarange Patil)

जरांगे यांना थेट विरोध करताना तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या, ओबीसीत आम्हाला आरक्षण (OBC Reservation) नको,
ते आमचेच बांधव आहेत. मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे वागत आला आहे. अजूनही वेळ गेली नाही,
मराठा समाजासाठी लढा. कायद्याने लढा. बेकायदेशीरपणे कुणबी प्रमाणपत्रे घेतली तर कोर्टात ते टिकणार नाही.
जर आरक्षणाचा मुद्दा त्याच टप्प्यावर येऊन थांबणार असेल तर सरकारकडे काय मागितले पाहिजे हे ठरवा.

तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या ही भूमिकाच चुकीची आहे.
जो माणूस आजपर्यंत गेल्या २ महिन्यात सात वेळा विधाने बदलतो, तो समाजासाठी योग्य नाही.
जरांगे पाटील यांनी कुणबी म्हणजे मराठा आहे, असे म्हटल्याने समाजाची दिशाभूल झाली आहे.
जो ९६ कुळी मराठा आहे त्या समाजाने काय करायचे, मराठ्यांनी कुणबी व्हावे हे तुम्ही सभेत सांगणार का?

जरांगे यांना इशारा देताना चव्हाण म्हणाल्या, आम्हाला कुणबी व्हायचे नाही.
त्यामुळे तुम्हाला यायचे असेल या, परंतु शिवतीर्थ येथे सभा होऊ देणार नाही,
जर कुणी परवानगी दिली तर त्याठिकाणी मी आमरण उपोषणाला बसणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतला समाचार, राज ठाकरेंनी सुनावले