मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : ‘माझ्या करिअरमधील सर्वात क्लिष्ट केसचा गुंता सुटला, महाराष्ट्र ATS चे DIG शिवदीप लांडेंची FB पोस्ट; पुण्याशी आहे त्यांचं नातं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली कार सापडल्या प्रकरणात सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा आरोप केला. यामुळे खळबळ उडाली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलिस विनायक शिंदे (वय-51) आणि बुकी असलेला नरेश गोर (वय-31) यांना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. या दोघांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लांडे यांनी म्हटले आहे की, अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील गुंता सुटला, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकला आहे. डीआयजी शिवदीप लांडे हे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री विजय शिवतरे यांचे जावई आहेत.

शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करुन या प्रकरणी न्याय पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून अभिवादन करतो. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे, असे शिवदीप लांडे यांनी नमूद केले आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसला सचिन वाझे यांचा ताबा हवा आहे. त्यासाठी वाझे विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे वाझेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वाझे यांच्या विरोधात भक्कम पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करत असून त्यांनी अनेक जबाब देखील घेतले आहेत. एटीएसने कोर्टात चार पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे आहेत. एनआयए कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे.