मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण, ‘त्या’ मर्सिडीज कारसह भाजप नेत्याचा फोटो, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. दरम्यान या प्रकरणात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सावंत यांनी वाझे यांच्याकडून एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडिज गाडी सोबत भाजप पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा दावा केला आहे. तसेच सावंत यांनी पुराव्यानिशी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन शेळके यांचे फोटो ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे वापरत असलेली एक मर्सिडिज कार एनआयएच्या पथकाला सापडली आहे. या कारमध्ये 5 लाखांची रोकड आणि पैसे मोजणारी मशीन मिळाला आहे. पण आता या कारमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सावंत यांनी ट्विट करून या गाडीसोबत भाजप पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा दावा केला आहे. मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत देवेन हेमंत शेळके यांचे फोटो आहे. शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भाजयुमोच्या ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड केली होती. याबद्दलचे नियुक्ती पत्रच सावंत यांनी ट्वीट केले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली.