मनसुख हिरेन प्रकरण : ‘सचिन वाझेंना निलंबित करून अटक करा’; विरोधक आक्रमक

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होत असताना या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची चौकशी सुरू होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह आढळला. त्यावरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबात तपास अधिकारी सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव समोर आल्याने त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच मागणीवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून, याप्रकरणी वाझे यांना अटक करावी’, अशी मागणी केली.

दरम्यान, सचिन वाझे यांचे नाव या प्रकरणात आल्यानंतर त्यांच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी लिहिलेली तक्रारही वाचून दाखवली.

गृहमंत्री सचिन वाझेला पाठीशी घालताहेत

सचिन वाझे हा एका पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख त्याला पाठीशी घालत आहेत. फक्त सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत म्हणून अपराध्याला पाठीशी घालणे योग्य नाही. सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपलब्ध पुरावे पुरेसे आहेत. त्यांना निलंबित करा आणि अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली.