आठवड्याभरात अनेक आमदार-नेत्यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’ ; मंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात भाजप आणि शिवसेनेच्या गोटातून नवनवीन बातम्या बाहेर येत आहेत. काही दिवसांपूर्वी महसुल मंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस- राष्ट्रवादीचे काही आमदार पुढच्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनीही असाच काहीसा गौप्यस्फोट केला आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. भविष्यात अनेकजण शिवसेनेत येतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उत आला आहे.

सध्या आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते नाशिकमध्ये आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा कुठल्याही हेतूसाठी नाही किंवा पदासाठी नाही. आदित्य ठाकरेंना सामाजिक प्रश्नांची उत्तम जान आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतात, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत प्रवेश करून आगामी विधानसभा लढवतील या चर्चांवरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकांच्या जागेसंदर्भात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. आता निवडणुकीला साधारण तीन महिने राहिले आहेत. त्यामुळे या आठवड्यात अनेक राजीनामे येतील असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात विरोधी पक्षातील किती आमदार आणि नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत, या प्रश्नावर चर्चा होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त