Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांचा महाविकासवर हल्लाबोल, म्हणाले – ‘फडणवीसांनी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारकडून बोर्‍या वाजला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमृत महामंडळाची योजना आखली होती. पण गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाचा ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ब्राम्हण, मराठा समाज डोळ्यासमोर ठेवून अमृत महामंडळाची घोषणा केली. त्यानंतर त्याची सर्व फाईल पूर्ण झाली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी याबाबत पत्रही लिहिले होते. पण कदाचित कोरोना संकटात व्यस्त असल्याने त्यांनी उत्तर दिले नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. ब्राह्मण समाजातील एक वर्ग हा मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपालाही खडे बोल सुनावले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना 4 वेळा पत्रव्यवहार केला, पण अद्यापही भेट मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान मोदींना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचे मत मांडले आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल तर भाजपचे कार्यकर्ते त्यात पक्षाचा झेंडा अन् बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.