मराठा आरक्षणाला राजकीय स्वरुप?; साताऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर राज्यभरात मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यावरूनच आता साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक सकाळच्या सुमारास झाली. दगडफेकीचा आवाज आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर आले. तेव्हा त्यांनी काही अज्ञात लोक पळून जाताना दिसले. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे, असे सांगण्यात आले आहे. तसेच ही दगडफेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादीने केला आहे. सातारा पोलिसांनी या दगडफेकीच्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरही निषेध

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेदेखील सातारा जिल्ह्यातूनच येतात. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेरही गोवऱ्या पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.