मराठा आरक्षण : जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदेंच्या भावाला नोकरी दिली पण…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनावेळी जलसमाधी घेतलेले औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली. त्यांचे भाऊ अविनाश यांना शिक्षकेत्तर पदावर लिपिक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र त्यांना 2 हजार रुपयांचे मानधन देण्याचे नियुक्ती पत्रात म्हंटले आहे.

मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनात अनेक युवकांनी जीव गमावले. यामध्येच औरंगाबाद येथील कायगाव टोका येथे झालेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. त्यावेळी सरकारने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत जाहीर करुन कुटुंबीयातील एका सदस्यास नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आमदार सतीश चव्हाण यांनी अविनाश यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या रघुनाथनगर (ता. गंगापूर) येथील न्यू हायस्कूलमध्ये ७ ऑगस्ट २०१८ ला कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी दिली.त्याप्रमाणे सरकारने काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरीही दिली. अविनाश शिंदे यांना शिक्षकेत्तर पदावर लिपिक म्हणून नियुक्ती देण्यात आली. मात्र, त्यांना दरमहा २ हजार रुपयांचे मानधन देण्याचे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे पुढील ३ वर्षांसाठी हे मानधन देण्यात येणार असून त्यानंतर ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येईल. असेही त्या नियुक्ती पात्रात म्हंटले असल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हे तर,आमदार चव्हाण यांनी शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेवर निर्बंध असल्याने पाठपुरावा करून अविनाश यांच्या नोकरीसाठी पदमान्यता मिळवली. सहाव्या वेतन आयोगानुसार, कनिष्ठ लिपिक पदासाठी अनुज्ञेय वेतनश्रेणीमध्ये नियुक्‍तीची मागणी शाळेने शासनाकडे केली होती. मात्र, २१ फेब्रुवारी ला मिळालेल्या नियुक्‍तिपत्रानुसार, तीन वर्षांकरिता अविनाशला महिना दोन हजार रुपये मानधन देण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अविनाशला शाळेकडून दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाईल, असे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हंटले आहे. याचबरोबर अविनाशच्या वेतनश्रेणीबाबतही सरकारने निर्णय घ्यावा. यासाठी नियुक्‍तिपत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फॅक्‍स करत वेतनश्रेणी नियमित करण्याची विनंती केली आहे. मात्र, सरकारचा निर्णय येईपर्यंत शाळेतर्फे अविनाशला दरमहा १० हजार रुपये देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.