मराठा आरक्षणप्रश्नी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत 

 मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच चिघळला आहे. राज्यभरात आज वेगवेगळ्या ठिकाणी बंद पाळण्यात आला. राज्यातील पुणे (चाकण) ,सोलापूर ,औरंगाबाद या ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. यात अनेक आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र या मुद्यावर काँग्रेस पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a186a08-93f6-11e8-9e6c-ff2f0b2a5e73′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाच्या आमदारांच्या भावना अतिशय तीव्र असल्याचे  अशोक चव्हाण म्हणाले. “पक्षाच्या बैठकीत अनेक आमदारांनी सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. तर काहींनी याबद्दल सभागृहात सरकारला जाब विचारायला हवा, अशी भूमिका मांडली. मात्र याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही,’ असे  चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या आमदारांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राज्यातील परिस्थिती स्फोटक आहे. यामध्ये हस्तक्षेप करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली. याबद्दलचं निवेदनदेखील काँग्रेसनं राज्यपालांना दिलं.