मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातील प्रतिष्ठित पुरस्कार ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फिल्म मेकर जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा आणि आशियाचे ऑस्कर असा मानला जाणारा ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहीर झाला आहे. इंडीकर यांची ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी इंडीकर यांना मिळालेला हा बहुमान ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

अक्षय इंडीकर यांनी आनंद व्यक्त करत इंस्टाग्रामवर म्हटले आहे की, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे. आशिया खंडातील सर्वोच्च असा एशिया पॅसिफिक यंग सिनेमा अवॉर्ड हा पुरस्कार एशियन सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. 70 देशांतून एका फिल्ममेकरला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आशियाचे ऑस्कर असा मानला जाणारा हा पुरस्कार ऑस्ट्रेलिया येथील ग्रीफिथ फिल्म स्कूल, युनिस्को आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी यांच्यातर्फे दिला जातो. अभिमानाची गोष्ट म्हणजे यांची मानद मेंबरशिपसुद्धा मला प्राप्त झाली आहे. आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे 70 देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. आजतागायत सुमारे 3000 सिनेमे या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरले आहेत.

उदाहरणार्थ नेमाडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटापासून इंडिकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. उदाहरणार्थ नेमाडेनंतर त्र्यिजा व स्थलपुराण हे त्यांचे चित्रपट जगभरातल्या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात दाखवले गेले. ‘स्थलपुराण’ हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जनरेशन कॉम्पिटिशन या विभागात प्रदर्शित झाला होता. याव्यतिरिक्त अतिशय मानाच्या अशा क्रिस्टल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले होते.

You might also like