मराठवाडा पाणी प्रश्न ! बैठकीला 55 पैकी फक्त 10 आमदार उपस्थित, शेतकऱ्यांची मुलं लोकप्रतिनिधींवर ‘भडकली’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्याचा पाणी प्रश्न गंभीर असून या प्रश्नी आज औरंगाबाद येथे मराठवाड्यातील आमदार आणि खासदारांची एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला मराठवाड्यातील 55 पैकी केवळ 10 आमदार उपस्थित राहिले. यावेळी उपस्थित असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी, पत्नी आणि विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा गंभीर असताना देखील लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठवाड्याच्या पाणी पश्नावर औरंगाबाद इथल्या हॉटेल अजिंठा अ‍ॅम्बेसेडरमध्ये आमदारांची बैठक बोलावली होती. मराठवाड्यातल्या 55 आमदारांपैकी केवळ 10 आमदार उपस्थित होते. यातील नऊ आमदार भाजपचे तर सेनेकडून केवळ संजय शिरसाठ उपस्थित होते. मात्र त्यांनी देखील काही वेळानंतर तेथून काढता पाय घेतला. उपस्थितांमध्ये मराठवाड्यातील 9 खासदारांपैकी एकही खासदार उपस्थित नव्हता. त्यामुळे या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांनी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरत संताप व्यक्त केला.

या आमदारांची बैठकीला दांडी
मराठवाड्यातील दिग्गज आमदारांपैकी लातूरचे अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील राणा जगजितसिंह पाटील, डॉ. तानाजी सावंत, परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे यांनी दांडी मारली.

हे आमदार उपस्थित होते
या बैठकीला संयोजक भाजपचे आमदार प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, रमेस पवार, रामराव पाटील रातोळीकर हे भाजपचे 9 तर शिवसेनेचे एकमेव संजय शिरसाठ असे एकूण 10 आमदार उपस्थित होते.