भाजप नगरसेवक संजय नेवाळे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा

निगडी : पोलीसनामा ऑनलाईन

स्वीट मार्ट दुकानासमोर चायनीज, ज्यूस आणि पाणीपुरीचा स्टॉल काढण्यास सांगून स्वीट मार्टमधील व्यवस्थापकाला मारहाण करुन दुकानाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे यांच्यासह सात जणांवर तोडफोड आणि मारहाण केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.३) रात्री पावणे दहाच्या सुमारास शिवतेजनगर, चिखली येथे घडला.

संजय नेवाळे, सचिन किरवे, स्वप्नील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) व इतर चार अनोळखी व्यक्‍ती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बदाराम भिकाजी देवासी (वय 24, रा. चेरी स्वीट मार्ट, शिवतेजनगर, चिखली. मूळगाव पाली, राजस्थान) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी हे चेरी स्वीट मार्टमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी त्यांच्या दुकानासमोर चायनीज, ज्यूस आणि पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे. रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास नेवाळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. त्यांनी देवासी यांना चायनीज, पाणीपुरी आणि ज्यूस सेंटर हे दुकानासमोर लावायचे नाही, असे सांगितले. यामुळे देवासी यांनी मालकाला फोन करून नेवाळे यांचा निरोप देत असातना नेवाळे यांच्यासोबत आलेल्या व्यक्‍तींनी कानाखाली मारल्या. त्यानंतर नगरसेवक संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करीत दुकानाची तोडफोड केली. हा प्रकार सीसी कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या वायरिंगचीही तोडफोड केली.