महापौर निवडणूक: शिवसेनेच्या बोराटे यांनी घेतला अर्ज

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महापौर पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपने शिवसेने विरहित सत्तेचे समीकरण जुळविलेले असले, तरीही युती होऊ शकते, या आशेवर शिवसेनेनेही तयारी सुरू ठेवली आहे.

बोराटे यांच्यासोबत माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे हेही उपस्थित होते. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांची भापजाच्या नेत्यांसोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

बसपाचा भाजपासाठी व्हिप
महापालिकेत बहुजन समाज पक्षाचे चार नगरसेवक आहेत. त्यांनी भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करावे, असा व्हिप पक्षाचे गटनेते मुदस्सर शेख यांनी बजाविला आहे. त्यामुळे भाजपकडून बाबासाहेब वाकळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे.
‘पोलिनामा’चा अंदाज ठरला खरा
महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने आकड्यांची जुळवाजुळव केली आहे. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची प्रतिक्षा असल्याचे वृत्त ‘पोलीसनामा’ने प्रसिद्ध केले होते. त्यात भाजपाला बसपाची साथ मिळण्याची शक्यताही वर्तवली होती. बसपाने बजावलेल्या ‘व्हिप’मुळे ‘पोलिसनामा’ने व्यक्त केलेल्या अंदाजावर शिक्कामोर्तब झाले आहे.