कर्जबाजारी व्यापाऱ्याची आत्महत्या, साताऱ्यातील घटना

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्यातील शनिवार पेठेत राहणाऱ्या मंझर महंमद हसन (वय ४४) यांनी दुकानाच्या वरील बाजूस असणाऱ्या जागेत गळफास घेवून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा व्यापारी पेठेत सुरु असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या शाहूपुरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

शनिवार पेठेत मंझर महंमद हसन हे राहण्यास असून त्याचठिकाणी बॅग हाऊस आहे. दुपारी ते दुकानाच्या वरील बाजूस असणाऱ्या जागेत गेले व त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. थोडावेळानंतर त्यांचा मुलगा दुकानात आला. दुकानात वडील दिसत नसल्याने त्याने हाका मारल्या, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तो दुकानात असणाऱ्या वरील जागेत गेला, यावेळी त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. यानंतर त्याने आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून जमलेल्यांनी मंझर यांच्या गळ्यातील फास सोडवत त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय तपासणीअंती मंझर यांना मृत घोषित करण्यात आले.

याठिकाणी पोलिसांनी मंझर यांनी परिधान केलेल्या कपड्यांच्या खिशातून चार चिठ्ठ्या जप्त केल्या. या चिठ्ठ्यांमध्ये आर्थिक बाबींची नोंद असल्याची चर्चा आहे. मंझर यांनी काही जणांकडून व्यवसायासाठी रक्कमा घेतल्या होत्या. या रक्कमा सुमारे २0 लाखांच्या घरात असून त्याची फेड मंझर हे वेळेवर करत होते. गेल्या काही दिवसांपासून सर्व रक्कम तत्काळ फेडण्यासाठी मंझर यांच्यावर संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर दबाव आणला होता. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा व्यापारी पेठेत तसेच मंझर यांच्या नातेवाईकांच्यात सुरु होती. याबाबतची प्राथमिक नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.