सेवाज्येष्ठता डावलल्यामुळे रजेवर गेलेले ज्येष्ठ IPS अधिकारी पांडे यांनी सरकारला पाठवला होता ‘तो’ महत्वाच्या प्रस्ताव, पण…

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारवर सुरु असलेल्या कथित आरोपातून सावरले नसताना आणखी एका पत्रामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘सरकार सेवाज्येष्ठता डावलत असल्या’चा जाहीर आरोप करीत रजेवर गेलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी कोट्यवधी रुपये वाचविण्याचा अडीच महिन्यांपूर्वी एक प्रस्ताव सरकारला पाठवला होता. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे होमगार्डमध्ये विलीनीकरण केल्यास वर्षाला किमान नऊ कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा केला आहे.

तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करणारा ‘लेटरबॉम्ब’ फोडून सरकारला अडचणीत आणले होते. दरम्यानच्या काळात सरकार सेवाज्येष्ठता डावलत असल्या’चा जाहीर आरोप करीत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे रजेवर गेले. त्यातच आणखी भर म्हणून रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामुळे सरकारसमोरील अडचणीत वाढ झाली. विरोधकांनी या प्रकरणाचा आधार घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व सुरु असताना कोरोनाचे संकट होतेच. आता या काळात गृह विभागातील पूर्वीच्या अनेक महत्त्वाच्या बाबी व पत्रव्यवहार समोर येत आहे. त्यामुळे सरकारची अडचणीत आणखी भर पदन्यासाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

होमगार्डचे महासमादेशक व सुरक्षा महामंडळाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. त्यावेळी त्यांनी सरकारचे कोट्यवधी रुपये वाचवण्यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला. सिंधुदुर्ग येथे प्रशिक्षण केंद्र आणि पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद येथे महामंडळाचे प्रशासकीय कार्यालये कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र होमगार्डची जिल्हास्तरावर ट्रेनिंग सेंटर व कार्यालये आहेत. दोन्ही संस्थांचे काम एकच असल्याने त्यांचे एकत्रीकरण केल्यास हा खर्च टळणार आहे. त्याचबरोबर वेतन, प्रशिक्षण व मुख्य कार्यालयाच्या भाड्यापोटी दरवर्षी महामंडळाच्या होणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत होईल असे या प्रस्तावात नमूद केले होते. तत्कालीन गृहसचिव सीताराम कुंटे यांना तो प्रस्ताव १२ जानेवारीला पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रस्तावानुसार विलीनीकरण झाल्यास वेतनावरील सहा कोटी, प्रशिक्षण व नोंदणी साठीचे एक कोटी व वर्ल्ड ट्रेंड सेंटरमधील ३२व्य मजल्यावरील मुख्यालयाचे १.७५ कोटी वाचणार आहेत.