मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याच्या डिग्रीवरूनही ‘वादंग’ ; नावासमोर डॉक्टर लावल्याने गोंधळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच मोदी सरकारचा शपथविधी पार पडला आहे. त्यामध्ये नव्याने मनुष्यबळ विकास मंत्रीपदी विराजमान झालेले रमेश पोखरियाल निशंक याची डिग्री वादात सापडली आहे. निशंक यांनी नावासमोर डॉक्टर पदवी लावली आहे. मात्र ज्या विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली ते विद्यापीठ नोंदणीकृत नसल्याचा तसेच ती पदवीदेखील खोटी असल्याचा आरोप होत आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि हरिद्वारचे खासदार असलेले निशंक यांनी हेमवती बहुगुणा गढवाल विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली आहे. त्यांच्याकडे पीएचडी ऑनर्स आणि डी.लीट ऑनर्स डिग्री आहे. या डिग्री त्यांना श्रीलंकेतील विद्यापीठाने दिल्या आहेत. मात्र हे श्रीलंकेतील विद्यापीठ नोंदणीकृत नाही. श्रीलंकेतील विद्यापीठ अनुदान आयोगाने याची पुष्टी केली आहे. तसेच आरटीआय अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीत हे समोर आले आहे. आरटीआयमधून निशंक यांचा अर्धवट बायोडाटा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे यात निशंक यांचा बायोडाटा आणि पासपोर्ट यातील जन्मताराखेत देखील तफावत आढळून आलेली आहे. बायोडाटामध्ये निशंक यांची जन्मतारीख १५ ऑगस्ट १९५९ आहे तर पासपोर्टवर १५ जुलै १९५९ आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री आणि वाद –

याआधीच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून झालेला वाढ चांगलाच गाजला होता. इराणी यांनी दिलेली आपली शैक्षणिक माहिती वेगवेगळी असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. विरोधकांकडून त्यांची ‘क्योंकी मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी…’ अशी खिल्ली उडवण्यात आली होती.