Coronavirus : इराणमध्ये ‘कोरोना’चा कहर, गेल्या 24 तासांत 129 मृत्यू, 1053 नवीन प्रकरणे, रुग्णांचा आकडा 14991 वर

तेहरान : वृत्तसंस्था – इराणमधील कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या 24 तासांत 129 लोकांचा मृत्यू झाला असून इराणमध्ये मृतांचा आकडा 853 वर पोहोचला आहे. तर एका दिवसात 1,053 नव्या प्रकरणांची पुष्टी झाली असून संक्रमित रूग्णांची संख्या 14,991 वर पोहोचली आहे. माहितीनुसार, इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या सर्वोच्च धार्मिक संघटनेच्या 78 वर्षीय सदस्याचेही संसर्गामुळे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये एकाच दिवसात मृत्यू होण्याचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते, कियानूस जहानपोर म्हणाले की, आम्ही लोकांना या विषाणूचा गांभीर्याने विचार करावा आणि लांबचा प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा पहिला मृत्यू इराणमध्ये 19 फेब्रुवारी रोजी झाला. सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार तेहरान प्रांतात कोरोना संसर्गाची सर्वाधिक 200 नोंद झाली आहे. इफ्हान प्रांतामध्ये 118 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दुसर्‍या क्रमांकावर आहे.

दरम्यान, इराणमधील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या विषाणूची लागण झाली होती. माहितीनुसार, मजिलसे खबरगाने रहबरीचे सदस्य अयातुल्लाह हाशीम बाथेई यांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यांना देशातील सर्वोच्च नेते निवडण्याचा आणि त्यांना हटविण्याचा अधिकार आहे यावरून देशातील या मजलिसांचे महत्त्व लक्षात येते. हा नेता देशातील सर्व महत्वाच्या धोरणांवर अंतिम निर्णय घेतो. इराणची 31 राज्ये या विषाणूमुळे वाईट रीतीने प्रभावित झाली आहेत.