‘फेसबुक’ने दिली धक्कादायक कबुली

मुंबई : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’ने एक धक्कादायक खुलासा करुन आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली आहे. कोट्यावधी वापरकर्त्यांचे पासवर्ड फेसबुकच्या अंतर्गत सर्व्हरवर सेव्ह करण्यात आले होते. ते देखील टेक्स्ट स्वरुपात. त्यामुळे फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला हे पासवर्ड सहजपणे पाहता येत होते, अशी कबुली फेसबुकने दिली आहे.

फेसबुक कंपनीबाहेरील कुणालाही हे पासवर्ड दिसण्याची शक्यता नव्हती आणि एकाही पासवर्डचा दुरुपयोग झालेला नाही, असे ही स्पष्टीकरण फेसबुकने दिले आहे. नियमित सायबर सरक्षा तपासणीच्या वेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. फेसबुकने वापरकर्त्यांसोबत केलेल्या सुरक्षा करारांचा हा भंग असल्याचा आरोप होत आहे.

एका ब्लॉग पोस्टद्वारे इंजिनिअरिंग, सिक्युरिटी ऍन्ड प्रायव्हसी व्ही पी पेड्रो कनाहौती यांनी याबद्दल माहिती दिलीय. ‘फेसबुक’च्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं या पासवर्डचा चुकीचा वापर केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ‘फेसबुक’वर याआधीही युझर्सचा डाटा असुरक्षित ठेवण्याचे आणि हा डाटा इतरांशी शेअर करण्याचे आरोप होत आलेत.