Pune : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार; पुणे व्यापारी महासंघ आक्रमक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर पुण्यात त्याहीपेक्षा कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता या निर्णयावरून पुणे व्यापारी महासंघ आक्रमक झाला असून, दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुणे व्यापारी संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठक झाली. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये नाराजी आहे. त्याचाच एक भाग आंदोलन छेडण्यात येणार आहे. या बैठकीत दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात गुरुवारी (ता. 8) विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलकासोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (ता. 9) सकाळी साडेआठ वाजता दुकाने उघडतील आणि सायंकाळी 6 वाजता बंद होतील’. दरम्यान, पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार असल्याने पोलिस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे. मात्र, या कारवाईवेळी व्यापारी वर्ग एकत्रित होऊन संबंधित व्यापाऱ्याच्या पाठीशी उभा राहील असेही ते म्हणाले.