कोट्यवधींचा रेडा पाहायला जालन्यात याच : अर्जून खोतकर 

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ‘पाच -पंचवीस लाखाची गाडी अथवा दोन कोटीची महागडी गाडीला नव्हे तर तब्बल २१ कोटींचा रेडा पाहण्यासाठी जालन्यात या’ असे आमंत्रण खुद्द पशुसंवर्धन विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

महा पशुधन एक्स्पो’चे आयोजन
जालना शहरामध्ये ११ जानेवारी ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘महा पशुधन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नामदार खोतकर यांनी आज ‘जालन्यात २१ कोटी रुपयांचा रेडा पाहायला या’ असे आमंत्रण आजपासूनच द्यायला सुरुवात केली आहे. आज जालना विधानसभा मतदारसंघातील पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेण्यापूर्वीच नामदार खोतकर यांनी पशूधन एक्स्पो पाहायला येण्याचे आमंत्रण सर्वांना सभाग्रहात दिले.

सलमान आणि युवराज कोट्यावधींचे रेडे
खोतकर यांनी १९ ते २३ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आणि ११ जानेवरी ते १३ जानेवारी दरम्यान महापशूधन एक्स्पोचे आयोजन केले आहे. या एक्स्पोमध्ये हरियाणा आणि हैदराबाद येथील दोन रेडे या एक्सोमध्ये सहभागी होणार आहेत. सुलतान असे नाव असणाऱ्या रेड्याची किंमत २१ कोटी रुपये असून युवराज नावाची रेड्याची किंमत ९ कोटी इतकी आहे. या रेड्यांना पाहायला असे आग्रहाचे आमंत्रण खोतकर यांनी दिले आहे. प्रदर्शनात गाईंच्या दुर्मिळ होत चाललेल्या जाती, ससे, बदक, जातिवंत कुत्रे, मांजर, अशा अनेक पशु या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत असेही खोतकर म्हणाले.